मुंबई - महापालिकेची तिजोरीची चावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाकडून मकरंद नार्वेकर यांनी तर काँग्रेसकडून आसिफ झकेरीया यांनी अर्ज भरलाय. स्थायी समितीचे संख्याबळ पाहता शिवसेनेचे यशवंत जाधव हे तिसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष होणार आहेत. मात्र भाजपाने काँग्रेसला मतदान केल्यास स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेला गमवावे लागेल. यामुळे भाजपाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेचे कामकाज सभागृह, वैधानिक, विशेष व प्रभाग समितीच्या माध्यमातून चालते. पालिकेच्या वैधानिक, विशेष व प्रभाग समितीच्या निवडणुका दरवर्षी एप्रिल महिन्यात संपन्न होतात. मात्र यावर्षी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणूक घेण्यास राज्य सरकारने बंदी घातली होती. नुकतीच ही बंदी उठवली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निवडणुका व सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळता यावेत म्हणून आज स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूक पालिका सभागृहात घेण्यात येत आहे.
वैधानिक समितीत स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती यांचा समावेश आहे. स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपाकडून स्थायी समितीसाठी मकरंद नार्वेकर तर काँग्रेसकडून स्थायी समितीसाठी आसिफ झकेरीया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने संध्या दोशी यांनी उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून सुरेखा पाटील यांनी तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरला आहे. समितीत शिवसेना 11, भाजपा 10, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 1, समाजवादी पक्ष 1 असे सदस्य आहेत.
शिवसेना, भाजपाने आपल्या स्वतःच्या उमेदवारांना मतदान केल्यास व काँग्रेसला राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने मतदान केल्यास शिवसेनेचा उमेदवार सहज जिंकू शकतो. मात्र काँग्रेस आणि भाजपाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. तर मात्र भाजपा शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसला मतदान करू शकते. अशावेळी विरोधी पक्षांची मते जास्त होऊन सत्ताधारी पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागू शकते. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक वेळापत्रक
पालिकेच्या 4 वैधानिक तर 6 विशेष समित्या आहेत. 5 ऑक्टोबरला शिक्षण आणि स्थायी समितीची, 6 ऑक्टोबरला बेस्ट आणि सुधार समितीची, 7 ऑक्टोबरला स्थापत्य शहर आणि स्थापत्य उपनगर समितीची, 8 ऑक्टोबरला सार्वजनिक आरोग्य आणि बाजार व उद्यान समितीची, 9 ऑक्टोबरला विधी आणि महिला व बालविकास समितीची तर 14 पासून 16 ऑक्टोबरपर्यंत 17 प्रभाग समित्यांची निवडणूक होणार आहे.