मुंबई - देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटांतील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये या वयोगटांतील ९ लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज झाली आहे. पालिकेकडून खासगी ३५० लसीकरण केंद्रांसह ज्युनियर कॉलेजमध्येही लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबत गाईडलाईन स्पष्ट केल्या नाहीत. या गाईडलाईन येताच लसीकरण सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Covid Expenses By BMC : करदात्यांची फसवणूक.. कोरोना, ओमायक्रॉनवरील खर्च मुंबई महापालिकेने दिलाच नाही..
कोरोना, ओमायक्रॉनचा प्रसार -
मुंबईमध्ये गेले पावणेदोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे टप्पाटप्प्याने लसीकरण गेले १० महिने सुरू आहे. मुंबईत १०७ टक्के नागरिकांना पहिला तर, ८५ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. जानेवारी २०२१ पर्यंत मुंबईमधील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही वाढू लागले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्याने लहान मुलांचे लसीकरण कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.
१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण -
जगभरात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. येत्या ३ जानेवारीपासून देशभरात १५ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण सुरू केले जात असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच, आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील वयोवृद्धांना बुस्टर डोस दिला जाणार असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
लसीकरणासाठी पालिका सज्ज -
लहान मुलांचे लसीकरण करता यावे यासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात ट्रायल सुरू होती. त्यात सहभागी मुलांवर लसीची ट्रायल घेण्यात आली आहे. यामधील एकाही मुलाला बाधा झालेली नाही. त्यातच आता पंतप्रधानांनी मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केल्याने पालिकेने १५ ते १८ वयोगटातीला ९ लाख मुलांचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. मुंबई महापालिकेच्या, खासगी ३५० लसीकरण केंद्रांवर तसेच, शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्येही लसीकरण केले जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी १ हजार ५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणादरम्यान जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
गाईडलाईन आल्यावर लसीकरण -
लहान मुलांचे लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप गाईडलाईन दिलेली नाही. ती येताच २ ते ३ दिवसांत लहान मुलांचे लसिकरण सुरू करू. लहान मुलांना लस देताना वापरण्यात येणारी सिरींज, सुई (निडल) कदाचित वेगळी असेल, निडलची साईज काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणे गरजेचे आहे. पालिकेकडे पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेत. लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का? याबाबतही गाईडलाईननंतर स्पष्टता येईल, असे काकाणी यांनी संगितले.
हेही वाचा - Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यपालांना साकडे