मुंबई - मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने अनेक प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता हा एक प्रकल्प आहे. यामुळे पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाणे सोपे होणार आहे. या प्रकल्पाच्या मार्गामध्ये हजारो प्रकल्पग्रस्त येतात. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेने या प्रकल्पासाठी १३०० कोटींची तरतूद केली आहे.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन - पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा चौथा महत्त्वाचा जोडरस्ता असलेल्या गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे काम चार टप्प्यांत सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोचणाऱ्या रस्त्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. तर रेल्वे हद्दीतील कामासाठी पालिकेने १०२ कोटी रुपये दिले आहेत. हे काम यावर्षी पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी प्रकल्पातील बाधित होणाऱ्या ६०० कुटुंबे, ५१ अनिवासी गाळे आणि १०० वंचित कुटुंब आदी ९०६ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कांजूरमार्ग येथे ३३२ कोटी रुपये खर्च करून २३ मजली ७ इमारती बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून प्रकल्पाला लागणारी जागा लवकरात लवकर मिळवण्याचा पालिका प्रशासनाचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड - पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पश्चिम उपनगरांतल्या गोरेगाव येथील पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि मुलुंड येथील पूर्वद्रूतगती महामार्ग जवळच्या मार्गाना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाची लांबी १२.२ किमी असून त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगल परिसराखालून प्रस्तावित भूमिगत बोगद्याची लांबी ४.७ किमी असेल. तर गोरेगाव फिल्मसिटीमधील प्रस्तावित पेटी बोगद्यासह भुयारी मार्गाची लांबी १.६ किमी असणार आहे. हा प्रकल्प चार टप्प्यात केला जाणार आहे. यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पूलाचे महापालिका हद्दीत रुंदीकरणाचे काम पूल विभागातर्फे हाती घेण्यात आले आहे. तर रेल्वे हद्दीतील काम रेल्वे प्रशासनाकडून केले जाणार आहे. हे कामही प्रगतीपथावर असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा असेल सहा पदरी उड्डाणपूल - प्रकल्पाचा दुसरा टप्पा जोडरस्त्याचे रुंदीकरण आणि बांधकामांत सुधारणा केली जाणार आहे. विकास आराखड्यानुसार ४५.७० मीटर रुंदीकरणाचे काम २०१८ पासून सुरु झाले आहे. सदर काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात चौकांची सुधारणा केली जाणार आहे. यात पश्चिम द्रूतगतीमहामार्गाच्या चौकामध्ये चार पदरी भुयारीमार्ग व गोरेगावातील रत्नागिरी हॉटेल चौक, दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी पर्यंत सहा पदरी उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याची उंची १२६५ मीटर असेल. तसेच मुलुंड खिंडीपाडा येथे चक्रीय मार्ग, डॉ. हेडगेवार चौक, मुलुंड येथे सहा पदरी उड्डाणपूल, तर पूर्वद्रूतगती मार्गाच्या चौकामध्ये सहा पदरी उड्डाण पूल बांधला जाणार आहे. चौथ्या टप्प्यात व्दितीय स्तरावरील उड्डाणपूल आणि द्रूतगती महामार्गाला छेदणा-या भुयारी मार्गाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. मे. टिपीएफ इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड या कंत्राटदार कंपनीची संरचनात्मक आराखड्यासह बांधकाम करण्याकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.