मुंबई - भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या जुहू तारा रोड येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम (Narayan Rane bungalow in juhu) केले आहे. हे बेकायदेशीर बांधकाम राणे यांनी स्वत:हून हटवावे, अन्यथा पालिकेला तोडक कारवाई करून हटवावे लागेल, असा इशारा मुंबई महापालिकेने (BMC Notice to Rane) 11 व 14 मार्च रोजी राणे यांना नोटीसीद्वारे दिला होता. त्याला राणे यांनी योग्य असे उत्तर दिले नसल्याने 16 मार्चला राणे यांना अंतिम तोडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात राणेंच्या बंगल्यावर कधीही पालिकेचा हातोडा पडू शकतो
- राणेंच्या बंगल्याला पालिकेची नोटीस -
मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम) च्या पदसिद्ध अधिकाऱ्याने मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये मालक कब्जेदाराला म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिली होती. के -पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक 18 फेब्रुवारी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी कर्मचार्यांसह आवारात किंवा CTS क्रमांक 997 आणि 997-A मध्ये प्रवेश करून मोजमाप व छायाचित्रे घेईल. त्यावेळी बंगल्याचे बांधकामावेळचे मंजूर करण्यात आलेले प्लान, बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्यात यावीत अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणे यांच्या बंगल्यात जाऊन मोजमाप घेतले होते. तसेच कागदपत्रे तपासली होती. त्यानंतर एक अहवाल तयार करून राणे यांनी बेकायदेशीर बांधकाम केले असल्यास पुन्हा नोटीस पाठवली जाईल असे सांगण्यात आले होते.
- कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा -
नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बदल केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पालिकेने राणे यांना 11 व 14 मार्च रोजी 351 कलमानुसार नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये बांधकाम करताना दिलेल्या प्लानमध्ये बदल करण्यात आले आहेत. पार्किंग, बेसमेंट आणि स्टोर रूमच्या जागेत रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे. पहिला, दुसरा, तिसऱ्या, पाचव्या माळ्यावरील टेरेसचा जागी रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे. चौथ्या, सहाव्या आठव्या माळ्यावरील पॉकेट टेरेसचा जागी तसेच आठव्या माळ्यावर टेरेस माळ्यावर रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम पालिकेच्या परवानगीशिवाय केले असल्याने ते बेकायदेशीर आहे. यामुळे बेकायदेशीर करण्यात आलेले बांधकाम स्वताहून 15 दिवसात काढावे अन्यथा पालिका कायदेशीर कारवाई करेल असे नोटीस मध्ये म्हटले होते.
- 15 दिवसात तोडक कारवाई -
मुंबई महापालिकेने दिलेल्या 351 कलमानुसारच्या नोटीसीला नारायण राणे यांनी योग्य उत्तर दिलेले नाही. त्यांच्या उत्तराने पालिकेचे समाधान झालेले नाही. यामुळे राणे यांनी पुढील 15 दिवसात बेकायदेशीर बांधकाम स्वताहून काढावे असे नोटीसीत म्हटले आहे. येत्या 15 दिवसात राणे यांनी बेकायदेशीर असलेले बांधकाम हटवले नाही तर पालिकेला हे बांधकाम तोडक कारवाई करून हटवावे लागेल असा इशारा 16 मार्चला दिलेक्या अंतिम नोटिसिद्वारे दिला आहे. राणे यांना दिलेली ही नोटीस अंतिम असल्याने राणे यांच्या बंगल्यावर येत्या 15 दिवसात पालिकेचा हातोडा पडणार हे आता स्पष्ट झाले आहे.