मुंबई - मुंबई मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत त्यात ६० वर्षाहून अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. वयोवृद्ध रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी क्षयरोगविरोधी बीसीजी लस वृद्धांना देण्यात येणार आहे. ६० ते ७५ वयोगटातील व्यक्ती कोरोना बाधित नसेल, त्याला एचआयव्ही किंवा कर्करोग नसेल, अशा ज्येष्ठांच्या संंमतीनंतर पुढील सहा महिने अभ्यास केल्यानंतर बीसीजी लस देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाची लागण वयोवृद्ध व्यक्तींना मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींना विविध आजार असल्याने त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी पालिकेने वयोवृद्धांचे मृत्यू रोखण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्धांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वयोवृद्धांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून लहान मुलांना दिली जाणारी बीसीजी लस वयोवृद्धांना देण्याचा विचार पालिका करत आहे.
बीसीजी लस लहान बालकांचे क्षयरोगापासून रक्षण करते, तर कोरोना विषाणू विरोधात ही लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना संकटसमयी बीसीजी लस वृद्धांसाठी उपयुक्त ठरते का, या दृष्टीने आयसीएमआरने संशोधन हाती घेतले आहे. ही लस दिल्यामुळे कोरोनाची शक्यता, गांभीर्य व मृत्यूदर कमी करता येईल का, ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करता येईल का याचा अभ्यास चैनई, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, जोधपूर व नवी दिल्ली या शहरांमध्ये केला जाणार आहे. पालिकेचे केईएम रुग्णालय व पालिकेचा आरोग्य विभाग मिळून हे संशोधन करणार असून अभ्यासासाठी योग्य त्या परवानगी मिळाल्या असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीजी लस अनेक श्वसनविकारांपासूनही रक्षण करते. ६० ते ७५ वयोगटातील निरोगी व्यक्ती तसेच ज्यांना एचआयव्ही किंवा कॅन्सरसारखा असाध्य रोग नसेल, अशा व्यक्तींवर बीसीजीची चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी २५० व्यक्तींची स्वयंसेवक म्हणून निवड केली जाणार आहे. परळ, लालबाग, शिवडी, भोईवाडा, वरळी आणि प्रभादेवी, लोअर परळ यात विभागांत ही चाचणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पालिका राबवत असलेल्या या बीसीजी ट्रायलमध्ये लोकांनी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन पालिकेने केल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.