मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण बहाल करण्यात आले आहे. त्यासाठी उद्या २९ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण लॉटरी काढली जाणार आहे. यामुळे याआधीची अनुसूचित जाती, जमाती आरक्षण वगळून इतर लॉटरी रद्द करून नव्याने लॉटरी काढली जाणार आहे. यामुळे मागील लॉटरीत प्रभाग आरक्षित झालेल्यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
महिला आरक्षण रद्द - मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३६ प्रभागांसाठी ३१ मे २०२२ रोजी ओबीसी आरक्षण वगळून प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसींच्या आरक्षित जागा खुल्या करून लॉटरी काढण्यात आली होती. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण तसेच ठेवून महिला आरक्षण रद्द केले आहे. आता नव्याने ओबीसींसाठी आरक्षण दिल्याने या आधीचे महिला आरक्षण रद्द करून नव्याने ओबीसी व नंतर महिला आरक्षण लॉटरी काढली जाणार आहे.
असे होणार प्रभाग आरक्षित - २०१७ च्या निवडणुकीत ओबीसींना एकूण २२७ प्रभगांपैकी ६१ प्रभाग आरक्षित होते. त्यापैकी ५० टक्के प्रभाग महिलांसाठी आरक्षित होते. आता ओबीसींसाठी २३६ पैकी ६३ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामधील ३२ प्रभाग महिलांसाठी आरक्षित केले जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २००७, २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत जे प्रभाग आरक्षित होते ते प्रभाग ओपन केले जाणार आहेत तर जे ओपन होते ते आरक्षित केले जाणार आहे. त्यासाठी प्राधान्य क्रमांक १, २ आणि ३ ठरवण्यात आले आहे. त्यानुसार आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तर उर्वरित प्रभागांमध्ये लॉटरी काढली जाणार आहे. ओबीसीसाठी प्रभाग राखीव झाल्यानंतर महिला आरक्षण काढले जाणार आहे.
ओबीसीसाठी हे प्रभाग आरक्षित - पालिकेने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्राधान्य क्रमांक १, २ व ३ नुसार ५३ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. तर उर्वरित १० प्रभाग २००७ मधील ओबीसी आरक्षित प्रभागातून राखीव करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ३, ७, ९, १२, १३, २७, ३०, ३८, ४०, ४२, ४८, ५१, १०१, ११०, ११७, १२८, १२९, ५३, ६२, ७६, ७९, ८१, ८७, ८९, १३२, १३५, १३७, १४६, १४७, १४८, १५०, १५२, १५४, १५५, १५९, १६१, १६४, १७४, १७९, १८०, १८३, १८५, १८८, १९५, २००, २०३, २०४, २१७, २१८, २२२, २२३, २३०, २३६ हे ५३ प्रभाग ओबिसिसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.