मुंबई - शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. खासगी रूग्णालयाकडून आणि अॅम्ब्युलन्स चालकांकडून कोरोना रूग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची लुटमार सुरू आहे. मात्र, आता येथून पुढे अशी लुटमार करणाऱ्यांवर आयएएस अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई केली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
शहरातील कोरोना रूग्णांचा आकडा 40 हजारावर गेला आहे. कोरोनाच्या रूग्णांवर वेळीच उपचार करण्याची गरज असताना रूग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही. रूग्णांना तासनतास बेडसाठी ताटकळत रहावे लागत आहे. रूग्णांना रूग्णालयात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्सही 5 ते 6 तासाने येत असल्याने रुग्णांचा जीव जात आहे. यासाठी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईमधील भाजपच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
हे आंदोलन सुरू असताना आयुक्त आणि गटनेते प्रभाकर शिंदे यांची भेट झाली. यावेळी बोलताना खासगी रूग्णालयातील जास्तीत जास्त खाटा ताब्यात घेण्याचा आणि कोरोना केअर सेंटरमध्ये पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. ती पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. खासगी रूग्णालयात रूग्णांकडून जास्त बिल घेतले जात असल्याच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभागवार आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. त्यांच्याकडे तक्रारी आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत रुग्ण वाढत असताना अॅम्ब्युलन्स वेळेवर मिळत नाही, याबाबत अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवली जात आहे. तसेच ज्या अॅम्ब्युलन्स रुग्णांकडून जास्त पैसे उकळत आहेत, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. रूग्णांना रिक्त बेडची माहिती मिळावी म्हणून डॅशबोर्ड बनवला आहे, तो पब्लिक डोमेनमध्ये टाकावा की टाकू नये याबाबत सरकारकडून निर्देश आलेले नाहीत, अशी माहिती आयुक्तांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. डॅशबोर्ड त्वरित सुरू करावा, अशी आम्ही सूचना केली असून आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचे आंदोलन यापुढेही सुरू राहिल, असा इशारा शिंदे यांनी दिला.