मुंबई - युरोप आणि साऊथ आफ्रिकेत पुन्हा कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. साऊथ आफ्रिकेत ओमिक्रोन (New Covid Variant Omicron) हा नवा कोरोना विषाणूचा व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC on Omicron Variant) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेने आरोग्य विभागाची (BMC Health Department) आज आढावा बैठक घेऊन सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येणाऱ्या देशांमधील आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांना ७ दिवस क्वारंटाईन (7 Days Quarantine) केले जाणार आहे. तसेच कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी मास्क विरोधी कारवाई कडक केली जाणार आहे. याबाबत आज पालिका आणि आरोग्य विभागाच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत चर्चा करण्यात आली असून, उद्या याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.
- पालिकेने घेतला आढावा -
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही नगरविकास मंत्र्यांनी आज दिले. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची आज बैठक झाली. या बैठकीत रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, विद्युत ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करून ती सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोविड रुग्णांना लागणारी औषधे, इंजेक्शन याचा पुरेसा साठा करण्याच्याही सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
- ७ दिवस क्वारंटाईन, कोरोना चाचण्या -
दक्षिण आफ्रिकेसह ज्या युरोपमधील देशात कोरोना आणि ओमिक्रोन विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत त्या देशातील नागरिक मुंबईत आल्यास त्यांना ७ दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे. ७ दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमध्ये जे प्रवासी निगेटिव्ह येतील त्यांना घरी सोडण्यात येईल. तर जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावर रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातील, असे गोमारे यांनी सांगितले.
- विनामास्क कारवाई कडक केली जाणार -
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे, हात सतत स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. परदेशातील नवा व्हेरियंटचा मुंबईत प्रसार होऊ नये म्हणून पालिकेकडून पुन्हा मास्क विरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.