मुंबई - घाटकोपरच्या भटवाडीतील एक शौचालय पालिकेने सोमवारी पाडले. यामुळे येथील रहिवाशांनी संतप्त होत पालिका परिमंडळ सहाचे उपायुक्त रणजित ढाकणे यांना घाटकोपर एन विभागाच्या दारात घेराव घालत पालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या.
देशात केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घराघरात ग्रामीण व शहरी भागात शौचालय बांधून देत आहे. यात मुंबई महानगरपालिका सुद्धा घरात जागा नसेल तर सार्वजनिक शौचालय बांधत आहे. मात्र, काही ठिकाणी महापालिका बिल्डर धार्जिणे निर्णय घेऊन चाळीतील किंवा झोपडपट्टी विभागातील शौचालय पाडताना दिसत आहे.
घाटकोपरच्या भटवाडीतील महाकाली माता मंदिर जवळील एका चाळीतील 30 वर्षे जुने असलेले शौचालय पालिकेने नोटीस न देता सोमवारी पाडून टाकले. त्यामुळे या विभागातील रहिवाशी संतप्त झाले आणि त्यांनी याचा विरोध केला. पण बिल्डरने पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत हे शौचालय पाडले, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
वाचा- गेल्या ६ वर्षात लोकलवर दगडफेकीच्या ११८ घटना; ११३ प्रवासी जखमी
या रहिवाशांनी स्थानिक शिवसेना नगरसेविका अश्विनी हांडे यांचे पती दीपक हांडे यांना याविषयी जाब विचारला. रहिवाशी संतप्त झाले हे पाहून हांडे यांनी घाटकोपर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आल्यावर या राहिवाशांनी आम्ही शौच करायला कुठे जायचे हा प्रश्न पोलीस अधिकारी आणि नगरसेवक पतीला केला. ते समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने राहिवाशांनी पालिकेच्या एन विभागाचे उपायुक्त रणजित ढाकणे यांना जाब विचारण्यासाठी घाटकोपर पालिका कार्यालय गाठले. पण त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त आधीच लावून ठेवण्यात आला होता.
ढाकणे हे बाहेर जाण्यासाठी कार्यालयाच्या खाली आले असता त्यांना या राहिवाशांनी घेराव घातला. त्यांना कारमध्ये बसू दिले नाही. आमची समस्या सोडवा असा आग्रह धरला. यावेळी उपायुक्त आपल्या कार्यालयात 3 ते 4 राहिवाशांना घेऊन गेले व त्यांना शांत बसा या प्रकरणी उद्या आपण यावर चर्चा करू, असे सांगून पुन्हा बाहेर जाऊ लागले. आक्रमक महिला व पुरुष रहिवाशी पाहून उपआयुक्त पोलीस बंदोबस्तात तेथून निघून गेले. त्यामुळे रहिवाशी संतप्त होत आमचा शौचालयाची लवकर पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा यापूढे आंदोलन तीव्र केले जाईल असे म्हणाले.