मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावतीने रक्तदानाबाबत आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार रक्ताचा तुटवडा लक्षात घेता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये राहणाऱ्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपले नाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदीरात दुरध्वनीद्वारे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नोंदवावे. रक्तदात्याच्या राहत्या घराजवळ, थेट सोसायटीच्या आवारात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहोचेल. त्यामुळे रक्तदात्यांना राहत्या ठिकाणी रक्तदान करता येईल.
कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे, असे नम्र आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले आहे. रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
022-24224438, 022-24223206