मुंबई - आज देशात वाढणारी महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, भ्रष्टाचार अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर उभा राहिला असताना हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य डोळस मनुष्याला जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सामान्य दृष्टिहीन व्यक्ती कसा जगत असेल असा प्रश्न निर्माण होतो. परंतु रंगगंध या संस्थेतील दृष्टिहीन विद्यार्थी या सर्व समस्यांपासून दूर राहून इतरांच्या जीवनात रंग भरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता तर चक्क त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या रेखाचित्रात रंग भरले आहेत.
रंगगंध मंत्र्याच्या दारी
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी दृष्टिहीन आणि दिव्यांगांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या रंगगंध संस्थेने भेट घेतली. याप्रसंगी दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी स्वतः मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रेखाटलेले छायाचित्र भेट स्वरूपात दिले. बहुजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योतीची निर्मिती केली आहे. या महाज्योतीच्या माध्यमातून दृष्टीहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सर्वोतोपरी मदत करणार, असा विश्वास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
'रंग म्हणजे रंगात गंध'
दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी रंग म्हणजे काय? तर रंगात गंध मिसळून त्यावरून तो ओळखायचा. जसे की गुलाब म्हणजे लाल रंग, चाफा म्हणजे पिवळा रंग अशा रंगांची निर्मिती त्यांनी केली आहे. या रंगातून अनेक दृष्टिहीन विद्यार्थी चित्रकला, हस्तकला शिकत आहेत. ही कला दुर्मिळ व अप्रतिम असून श्रीरंग संस्था करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे सांगत गंधातून रंग ओळखून चित्र रेखाटण्याची कला अवगत झाल्यास गरजू दृष्टीहीनांच्या हाताला काम मिळू शकेल. त्यांना आधार मिळेल. म्हणून दृष्टिहीन बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही कला विकसीत करून महाज्योतीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना रंगांच्या गंधातून चित्र ररेखाटण्याची कला रंगगंध सेवाभावी संस्थेचे डॉ. सुमित पाटील यांच्याकडून अवगत केली आहे.
'भविष्य घडवण्यासाठी मदत'
कुठल्याही प्रसंगी मदतीची अपेक्षा असली मदत व पुनर्वसन मंत्र्याची आठवण केली जाते. पण आम्हाला मदत म्हणून आमचे भविष्य घडवण्याची संधी त्यांच्याकडून हवी आहे. त्यासाठी आमची ही कला शाळेपासूनच शिकवली जावी. जेणेकरून त्याने एक नवीन करिअर तयार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आकांक्षा वाकडे या दृष्टिहीन विद्यार्थीनीने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत - विजय वडेट्टीवार