मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसी कोविड सेंटर बंद करत तेथील रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर आता हे कोविड सेंटर थेट 1 जूनला रुग्णसेवेत दाखल होणार आहे. पण या सेंटरमधील लसीकरण मात्र उद्यापासून सुरू होणार आहे. मुंबई महानगर पालिकेकडून 1 जूनला हे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पावसात बसतो फटका
बीकेसी कोविड सेंटर हे सखल भागात असून खुल्या मैदानात सेंटर उभारण्यात आले आहे. ऊन, वादळ, वारे आणि इतर सर्व बाबीचा अभ्यास करत हे सेंटर उभारण्यात आले आहे. असे असले तरी चक्रीवादळाचा परिणाम मोठा असतो. त्यामुळे खबरदारी म्हणून निसर्ग आणि तौक्ते वादळात या सेंटरमधील रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले होते. वादळाचा फटका सेंटरला बसतो. पण गेल्या वर्षी प्रत्येक मोठ्या पावसात बीकेसी कोविड सेंटरच्या परिसरात पाणी साचण्याच्या, चिखल होण्याच्या घटना घडल्या आहेत. तर या पावसातही पाणी साचण्याची रुग्णांना हाल सोसावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण सेंटर प्रशासनाने मात्र पाणी साचू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - 'खतांच्या किंमतीतून किसान सन्मानची वसुली सुरू'
सर्वात मोठे लसीकरण केंद्र
बीकेसी जम्बो कोविड सेंटर हे मोठे आणि रुग्ण सेवेतील आघाडीचे कोविड सेंटर ठरले आहे. या सेंटरमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. तर आतापर्यंत 22 हजाराहुन अधिक रुग्ण येथून बरे होऊन गेले आहेत. त्याचवेळी येथील लसीकरण केंद्र सर्वात मोठे लसीकरण केंद्र असून येथे देशातील सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तेव्हा महत्वाचे असे हे सेंटर कधी सुरू होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. त्यानुसार लसीकरण केंद्र उद्यापासून सूरू होणार आहे. तर कोविड सेंटर 1 जूनपासून सूरू होणार आहे अशी माहिती डॉ राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी कोविड सेंटर यांनी दिली आहे. पालिकेच्या निर्देशानुसार 1 जूनपासून सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
मोनो दुपारी साडे तीन वाजल्यापासून ट्रॅकवर
तौक्ते वादळाचा फटका मुंबईतील मोनोरेल सेवे लाही बसला. सोमवारी खबरदारी म्हणून चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्ग बंद ठेवण्यात आला. तर आज हा मार्ग सकाळी सुरू करण्यात येणार होता. पण रात्री मोनो ट्रॅकवर झाडाची फांदी पडल्याने सकाळी मोनो सुरू करता आली नाही. पण सकाळी फांदी हटवत ट्रॅक मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी हे काम पूर्ण झाले. त्यानुसार साडे तीन वाजता मोनो मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती बी जी पवार, सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)यांनी दिली आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळामुळे तब्बल 400 ते 500 झाडे पडले उन्मळून; अनेक वाहनांचे नुकसान