मुंबई:शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपच्या काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचा पदभार असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM devendra fadnavis) यांनी स्वतःकडे सहा जिल्ह्यांचा पदभार ठेवला आहे. वास्तविक त्यांच्याकडे असलेली विविध खाती पाहता सहा जिल्ह्यांचा पदभार ते सांभाळू शकतात का हा खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर भाजपच्या काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्हे सोपवण्यात आले आहेत. या यादी संदर्भात जाणकारांशी चर्चा केली असता भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी अन्य निवडणुकांच्या दृष्टीने राज्यावर आपली पकड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मिशन 151 साठी रणनीती (BJP mission 151) भाजप आता सत्तेत आहे. तरी भाजप 2024 निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करीत आहे. 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपला कोणाच्याही कुबड्यांशिवाय स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करायची आहे. त्यासाठी भाजपने आपले मिशन 151 हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भासह राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी भाजपने स्वतःकडे घेणे अपेक्षित होते. त्यानुसार, भाजपने या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आपल्या ताब्यात घेतले आहे अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावरही भाजपचे वर्चस्व राहणार दरम्यान, भाजपने आपल्या मत्र्यांकडे अनेक जिल्ह्यांचा पदभार स्वीकार सोपवला असल्याने आणखी एक बाब स्पष्ट होत आहे की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपच्या अधिक मंत्र्यांची वर्णी लागणार आहे. कारण ज्या मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचा पदभार आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सहा जिल्ह्यांपैकी केवळ नागपूर हा महत्त्वाचा जिल्हा स्वतःकडे ठेवून ते बाकीचे जिल्हे आपल्या मंत्र्यांकडे देतील अशी शक्यता आहे म्हणजे पुन्हा एकदा मंत्रिमंडळावर भाजपचच वर्चस्व राहणार आहे. हे सुद्धा स्पष्ट होत आहे.
शिंदे गटाला केवळ शिवसेना संपवायची आहे- जोशी शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असलेली जिल्हा निहाय जबाबदारी पाहिली तर शिंदे गटाला केवळ शिवसेनेला संपवण्यासाठीच बळ दिले जात आहे. असे म्हणता येईल. शिंदे गट भाजपा किंवा राष्ट्रवादीला संपवण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली करताना दिसत नसून केवळ शिवसेनेला कसे संपवता येईल हाच शिंदे गटाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे ज्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तिथे शिवसेना प्रबळ आहे असेही जोशी यांनी सांगितले.