मुंबई - भाजपा कार्यकारिणीची बैठक आज प्रदेश कार्यालयात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीनंतर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लढण्याबाबत रणनीती ठरल्याची माहिती दिली. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या राजीनामा संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा ( Nawab Malik Resign ) झाली. एकंदरीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्याबाबात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुनगंटीवर यांनी ( Bjp Target Mahavikas Aghadi Government ) दिली आहे.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आवाज उठवणार
केंद्रातील योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य सरकार अपयशी आहे. नवाब मलिक यांनी जमीन घेतली हे तर खरे आहे. मग याला सुडाचे राजकारण कसे म्हणता येईल. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात 11 कोटी जनता आहे, त्यात १ कोटी २९ लाख मुस्लिम आहेत. मग फक्त नवाब मलिक यांनाच दोषी का ठरवण्यात आले?, असा सवालही मुनगंटीवर यांनी विचारला आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी आवाज उठवला जाईल, असेही त्यांनी म्हटलं.
सरकारला जनतेचा विसर
राज्यातील 97,331 बूथवर भाजपा पूर्णपणे ताकदीनिशी काम करुन राज्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकरी, बेरोजगार, महिला अत्त्याचार, भ्रष्टाचार यासोबत महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताना जी वचने जनतेला दिली होती त्याचा विसर या सरकारला पडला आहे. त्यासंदर्भात त्याची आठवण सरकारला करून दिली जाईल. चांद्यापासून बांद्यापर्यंत जे काही प्रश्न आहेत, त्याबाबत सरकारला जाब विचारला जाईल. याविषयी बैठकीत रणनीती ठरवली असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.