मुंबई - राज्यात माहाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे सर्व लक्ष आपला पक्ष आणि सत्ता वाचावण्याकडे केंद्रित केले आहे. मात्र त्याच वेळी भाजपाने मुंबई महानगरपालिका जिंकून आपला महापौर बनवण्याची तयारी सुरू आहे. राज्यात अडीच वर्षापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षानी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केले. सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली असताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंडखोरी केली. शिवसेनेचे बहुसंख्य मंत्री आमदार यांनी शिंदे यांच्या बंडखोरीला साथ दिली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) धोक्यात आले आहे. धोक्यात आलेले आघाडी सरकार आणि शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत.
पालिकेवर भाजपाचा महापौर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यात गुंतले असताना भाजपा मात्र आपला यात हात नाही, असे सांगून अलिप्त असल्याचे दाखवत आहे. नुकतीच भाजपाच्या मुंबई कार्यकारणीची एक बैठक मुंबईत संपन्न झाली. भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला मुंबई महानगर पालिका आपल्या ताब्यात कशी घ्यायची, पालिकेवर आपला महापौर कसा निवडून आणायचा यावर चर्चा करण्यात आली.
'भाजपाचा महापौर' : भाजपाने मुंबई महापालिकेत १३४ नगरसेवक निवडून आणता येईल यासाठी "मिशन १३४" सुरू केले आहे. यासाठी भाजपाकडून तयारी सुरू करण्यात असली आहे. याबाबत बोलताना, मुंबईकर जनतेने ११८ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेत मुंबईकरांचा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल, असा विश्वास भाजपा आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे.
'महापौर शिवसेनेचाच' : प्रत्येक राजकीय पक्षाला आपला महापौर, मुख्यमंत्री बनावा अशी अपेक्षा असते. लोकशाहीत त्यांना असा विचार करण्याचा अधिकार आहे. मुंबईत शिवसेनेचे चांगले काम आहे. यामुळे मुंबईकर सतत शिवसेनेच्यासोबत राहिला आहे. पालिकेत शिवसेनेची २५ वर्षे सत्ता आहे. मुंबईकर नागरिकांची नाळ शिवसेनेसोबत जोडली आहे. या कारणाने मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसेल, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर व प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - VIDEO : आमदारांबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना; ओमशा पाडवी यांची प्रतिक्रिया