मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे धक्कादायक आरोप केले होते, त्यानंतर या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात सहा महिन्यांत समितीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी आक्षेप घेत, टीका केली आहे. गृहमंत्र्यांची नुसतीच चौकशी करण्यात येणार आहे. या साठीच ही समिती गठीत झाली आहे. या समितीमधून कोणताच अहवाल पुढे येणार नाही. ही समिती म्हणजे लोकांना एप्रिल फूल करण्यासाठी बनवण्यात आली असल्यामुळे आम्ही या समितीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'हवा तसा चौकशी अहवाल समितीच्या माध्यमातून समोर येणार'
परमवीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप लावले होते, त्यानंतर परमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. नंतर त्यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली. दरम्यान काल सरकारने कैलास चांदीवाल समिती गठीत करून गृहमंत्र्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या समितीमधून कोणताच अहवाल समोर येणार नसल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे. कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्टनुसार या समितीची रचना करण्यात आली नाही. या समितीच्या समोर चौकशीसाठी कोण कोण जाणार आहे या संदर्भात देखील कोणतीच माहिती नाही. त्यामुळे हवा तसा अहवाल यावा त्यासाठी ही चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांच्यावर टीका
या पत्रकार परिषदेमध्ये केशव उपाध्याय यांनी राज्याच्या बालविकास व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहत एमपीएससी परीक्षेमध्ये संघाचा सर्वात जास्त उल्लेख होत आहे, या संदर्भात तक्रार केली होती. त्यावरून केशव उपाध्ये यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या खात्यामध्ये अधिक लक्ष घालावे, काँग्रेसने संघाचा जास्त विचार करू नये, कारण संघ हा नेहमी देशहितासंदर्भातच विचार करतो असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध; राज्य सरकारची नवी नियमावली दोन दिवसांत