मुंबई - महाराष्ट्र भाजपाचे नेते तसेच आमदार संजय कुटे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामधील रोज सकाळी होणाऱ्या मॅरेथॉन बैठकीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सरकारला गेल्या दोन दिवसापासून बैठका घेण्याचे कारण काय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती या सरकारने कधीच इतक्या सकाळी लवकर बैठका घेतलेल्या नाहीत. सचिन वाझे हे प्रकरण आल्यानंतर या बैठका का घेतल्या जात आहेत, या बैठका सकाळच्या होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणांमध्ये लक्ष का देत आहेत, असा सवाल संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
'जनतेच्या प्रश्नांसाठी बैठका कधी?'
भाजपाचे नेते आमदार संजय कुटे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर खरमरीत टीका केली. त्यांनी सांगितले, की पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठीसुद्धा बैठकीचा धडाका कधी लावणार, असा सवाल या पत्रकार परिषदेत त्यांनी उपस्थित केला आहे.
'सक्तीची वीजबिल वसुली'
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी जेरीस आला आहे. त्यात सक्तीची वीजबिल वसुली ते सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर कोसळले आहे. अशा परिस्थितीमध्ये हे महाविकास आघाडी सरकार या विषयाला महत्त्व न देता सचिन वाझे या प्रकरणाला महत्त्व देत आहे, असे ते म्हणाले.