मुंबई - गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी भेट दिली आहे. या भेटीदरम्यान नितेश राणे सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनात झाले तर मंत्र्यांची दुकाने बंद होतील. एसटीच्या विलीनीकरणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आम्ही एकमुखी पाठिंबा देऊ, असेही नितेश राणे सांगितले.
हेही वाचा - समीर वनखेडेवर कारवाई करून दाखवा; पुढचा कार्यक्रम आम्ही करू - नितेश राणे
'एसटीचे विलीनीकरण झाले तर मंत्र्यांची दुकाने बंद होतील'
आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात एसटी कामगारांची आमदार नितेश राणे यांनी भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. एसटी कामगार हे आमचे भाऊ, बहीण आहेत. जेव्हा जेव्हा गरज लागेल, तुम्ही हाक द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. गेल्या 8 वर्षांपासून परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. यात भाजपाचा हस्तक्षेप कुठे नाही. केबिनमध्ये बसून बोलण्यापेक्षा आझाद मैदानात या. जर एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनात झाले तर मंत्र्यांची दुकाने बंद होतील आणि कर्मचाऱ्यांचा फायदा होईल. म्हणून आता शासनाने ठरवावे, की कर्मचाऱ्यांचे हित पाहावे की त्यांचा फायदा पाहावा, असा प्रश्नही राणे महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
हेही वाचा - संजय राऊत, नवाब मलिकांना शाहरुख खानने भाड्याने घेतले - नितेश राणे
...तर एकमुखी पाठिंबा - नितेश राणे
एसटी महामंडळाला शासनात विलीन करा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संप आणि संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, तरीही राज्य सरकार कोणतीही मदत करू इच्छित नाही. संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, कमी पगारात काम करावे लागत आहे. या महागाईच्या काळात एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह कसा करणार, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला आहे. एसटीच्या विलीनीकरणासाठी सरकारने तत्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, आम्ही एकमुखी पाठिंबा देऊ, असेही नितेश राणे सांगितले.