मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना विमा बंद केल्याच्या कारणावरून खोचक पत्र लिहिल आहे. कोविडच्या कठीण प्रसंगांमध्ये या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य अचूक बजावलं. या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली तेव्हा, "करून दाखवलं" अशा घोषणा देण्यात आल्या. मग आता हा विमा बंद केल्यानंतर याचे श्रेय कोण घेणार, असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
काय आहे नितेश राणे यांच्या पत्रात?
आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वत:च्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविडकाळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’चीही जगभर वाहवा ‘मिळवून’घेतात. पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात, अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे, हे आपणास माहीत नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे.
![नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_11092021095113_1109f_1631334073_364.jpg)
![नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_11092021095113_1109f_1631334073_29.jpg)
माध्यमांतून बातम्या झाल्या होत्या प्रकाशित
जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा त्याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते. आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेव्हा ही योजना बंद झाली, याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का, असा सवाल पत्रातून राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला आहे.