मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचना करण्यात आली आहे. यावर सूचना, हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महानगरपालिका भाजपा नगरसेवकांची एक बैठक झाली. या बैठकीत प्रभाग रचनेवर हरकती घेण्याचे ठरवण्यात आले असून, वेळ पडल्यास त्यावर भाजपा कोर्टात जाईल, असा इशारा भाजप आमदार मिहीर कोटेचा ( BJP MLA Mihir Kotecha comment on ward structure ) यांनी दिला.
हेही वाचा - Ramesh Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, अभिनयाचा देव हरपला
भाजपाची प्रभाग रचनेवर चर्चा -
मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ ८ मार्च २०२१ ला संपत आहे. त्याआधी निवडणूक होणे अपेक्षित होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेतील २२७ वॉर्डमध्ये ९ ची वाढ करत २३६ वॉर्ड केले आहेत. या २३६ वॉर्डसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या असून १६ फेब्रुवारीपर्यंत त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेत भाजपा नगरसेवक, मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा आणि पालिकेतून विधान परिषदेवर गेलेले राजहंस सिंग उपस्थित होते. या बैठकीत प्रभाग रचनेवर चर्चा करण्यात आली. तसेच, ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली आहे, त्या ठिकाणी हरकती दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर कोर्टात जाणार -
आज महापालिकेत भाजपच्या झालेल्या बैठकीत प्रभाग रचनेवर चर्चा करण्यात आली. मोठे रस्ते, नाले, रेल्वे लाईन, पूल यांचा विचार करून प्रभाग रचना केली जाते. मात्र, आता करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. या विरोधात भाजपाकडून हरकती दाखल केल्या जाणार आहेत. त्यावर योग्य प्रकारे सुनावणी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अन्याय पद्धतीने प्रभाग रचना झाल्यास त्या विरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा आमदार मिहीर कोटेचा यांनी दिला.
सोमैयासह, भाजपा गटनेत्यांना फटका -
भाजपाचे महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड रेल्वेच्या दोन्ही बाजूला विभागण्यात आला आहे. त्यांचा विभाग ५ किलोमीटर इतका करण्यात आला आहे. रेल्वेच्या पलीकडील ३० ते ४० टक्के भाग त्यांच्या विभागात समाविष्ट केला आहे. शिवसेनेला कोंडीत पकडणारे किरीट सोमैया यांचा मुलगा निल सोमैया ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात त्या प्रभागातील १० बूथ काढून प्रभाकर शिंदे यांच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे निल सोमैया यांच्या विभागात ४७ हजार मतदार तर, प्रभाकर शिंदे यांच्या प्रभागात ६० हजार मतदार झाले आहेत.