मुंबई - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खोटी विधानं करून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखेळ केल्याचा आरोप भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसेच सामंत यांनी अधिकारांवर अतिक्रमण करून बेकायदेशीर कृत्य केल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे सामंत यांची पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भातखळकरांनी केलीय.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी असा दावा केला होता की, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही. याबाबत त्यांनी निवेदन देखील पाठवले. मात्र आज नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कोणत्याही प्रकारचे निवेदन दिले नसल्याचे स्पष्ट केले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप भातखळकरांनी केला.
कुलगुरूंच्या अधिकारात मंत्र्यांची ढवळाढवळ
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात राजकारण करण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. कायद्याने विद्यापीठं स्वायत्त असताना खरं तर कुलगुरूंच्या बाबतीत मंत्र्यानी ढवळाढवळ करणे केवळ अयोग्य नाही तर बेकायदेशीर आहे. याच मंत्र्याच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या खर्चाच्या व निविदांच्या बाबतीत माहिती मागवली होती. कुलगुरू म्हणून आपण सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहात. अशा वेळी उच्च शिक्षणमंत्र्यांनी खोटी विधानं करून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखेळ करणे टाळावे. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या अधिकारात त्यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.