मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा ते राजकारण आणि आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबईची सफर केली. कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांसाठीही एखादं पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे -
माननीय पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो’, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.