मुंबई - कोरोनाच्या महामारीत राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतले काँग्रेसचे नेते मोदी सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली होती. याला आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले यांना ट्विटरवरून उत्तर दिलेल आहे.
मेंदूला संसर्ग होण्यासाठी कोरोना जबाबदार असण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी काँग्रेस नेता असणे पुरेसे आहे असा टोला अतुल भातखळकर यांनी नाना पटोलेंना लगावलेला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे, तर देशात लसीकरण कमी झाल्याने मृत्यूंची संख्या वाढत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पटोले यांनी पंढरपुरात प्रचार सभा घेतली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.
मोदी सरकारच्या काळात सात वर्षात सरकारवर एक लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे. प्रतिलिटर 22 रुपयांचा अधिक कर जनतेकडून घेतला जात आहे. शेतकऱ्यांच्या नावाने हे सरकार पैसा गोळा करून लूट करत आहे. 2019 मध्ये देशांच्या सीमा बंद केल्या असत्या तर आज देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसला असता अशीदेखील टीका यावेळेस त्यांनी केली होती.
नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर ती तखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाना पटोले यांच्या वरती टीका करत ट्विट केले आहे. ते म्हणाले मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेस नेता असणे पुरेसे आहे.