मुंबई - नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर त्याला आमचा विरोध नाही. पण, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव किती नवीन प्रकल्पांना देण्यात येणार आहे? याचा विचार व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यात येणार असेल तर त्याला भाजपचा कधीही विरोध नसणार आहे. दि बा पाटील यांचं कार्य खूप मोठ आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे नाव द्यायचे आहे त्या ठिकाणी आमचा विरोध नसणार आहे, असं आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
राज्याच्या राजकारणात आत्ता भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष सुरू असून दररोज आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. त्यातच आता नवीन वादाला तोंड फुटले आहे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे या मागणीवर शिवसेनेचे नेते अडून आहेत आणि त्या संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. तर दुसरीकडे लोकनेते दी बा पाटील यांचे नाव या विमानतळाला दिले गेले पाहिजे अशा मुद्यांसाठी नवी मुंबईतील विविध गावातील नागरिक आणि स्थानिक आमदार आग्रही आहेत.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी पनवेल-उरण, अंबरनाथ, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड या संपूर्ण भागातील स्थानिक रहिवाशांनी काल मानवी साखळी आंदोलन केले आहे. भूमिपुत्रांच्या या मागणीला भाजपा ने देखील पाठिंबा दिलेला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदि यांनी या आंदोलनांमध्ये भाग घेत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला न देण्यात यावं याचा विरोध दर्शवला आहे. या संपूर्ण प्रकरण संदर्भात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या मानवी साखळी आंदोलनाला पाठिंबा देत भूमिपुत्रांच्या मागण्यांचा विचार सरकारने करावा, अन्यथा याला एक मोठं आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होईल, अशी प्रतिक्रिया यावेळेस माध्यमांना दिलेली आहे.