मुंबई - हवामान खात्याने मुंबईत 13 आणि 14 जूनला मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला असला, तरी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात असणारे "कंट्रोल रूम" एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए यांचे कंट्रोल रूम अद्याप पुर्ण सज्ज नाहीत. त्यांची जुळवाजुळवीच सुरू असल्याचा आरोप भाजपचे आमदार व माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी मुंबईतील डिझास्टर कंट्रोलरूमची पाहणी केल्यानंतर हा आरोप केला आहे.
मुंबई महापालिका एकीकडे कोविड रुग्णांच्या रुग्णसेवेत असली तरी या वर्षी मान्सून पूर्वतयारीच्या कामात दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. शेलार यांनी नुकतीच मुंबईतील नालेसफाईची पाहणी केल्यानंतर यावर्षी केवळ 40 टक्के नालेसफाई झाल्याचे निदर्शनास आणून दिली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळापूर्वी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला भेट देऊन नियंत्रण कक्ष बेसावध असल्याचेही त्यांनी उघड केले होते. आता पाऊस मुंबईत कधी दाखल होईल यापूर्वीचा अनुभव पाहता ज्याप्रकारे यंत्रणा सुसज्ज ठेवावी लागते, त्या पद्धतीने यावर्षी यंत्रणा सज्ज आहे का ? हे त्यांनी आज पाहिले असता, अद्यापी नियंत्रण कक्ष जुळवाजुळव करीत आहेत. सर्व यंत्रणा व कनेक्टिव्हिटीने नियंत्रण कक्ष सज्ज नसल्याचे चित्र समोर आल्याचे शेलार यांनी सांगितले.
आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या नियंत्रण कक्षासह, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी केली. मुंबई महापालिकेचे नियंत्रण कक्ष सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे मान्सूनच्या कामाबाबत अद्याप म्हणावी तशी तयारी दिसली नाही. याबाबत पालिका यंत्रणेचे दरवर्षी पेक्षा दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. ज्या एमएमआरडीएचे मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत, त्या एमएमआरडीएचा डिजास्टर मॅनेजमेंट रूम केवळ 200 फुटांचा असून एक संगणक, एक दूरध्वनी, या पलीकडे तिथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. या कक्षात अधिकारी उपलब्ध नाही, असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. आपत्कालीन काळात आवश्यक असणारी व कार्यरत राहणारी तांत्रिक यंत्रणा कोणत्याही स्वरूपात उभी केली पाहायला मिळत नाही असे शेलार म्हणाले.
एमएसआरडीसीचा जीआर कालच निघाला असून त्यांच्या नियंत्रण कक्षात यंत्रणा तुलनात्मक बरी आहे. मात्र मुंबईतील रस्ते आणि उड्डाणपूल याबाबतची जबाबदारी असणाऱ्या एमएसआरडीएकडे पावसाळ्यामुळे खड्डे पडल्यास संबंधित अभियंत्याला कळल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून कोल्डमिक्स अथवा हॉटमिक्स उपलब्ध केले जाणार त्यासाठीची वाहतूक यंत्रणा कशी असणार? याबाबत कोणतीही सुसज्जता एमएसआरडीसीच्या नियंत्रण कक्षात दिसून आलेली नाही. दरवर्षी मुंबईला पाऊस, पुराचा फटका, रस्त्यावर पडणारे खड्डे याचा आजवरचा अनुभव पाहता तिन्ही यंत्रणांचे आपत्कालीन कक्ष अद्याप परिपूर्ण सज्ज नाहीत, असे दिसून आल्याचे आमदार शेलार यांचे म्हणणे आहे.