मुंबई - शहर आणि परिसरात कोरोना विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. असे असताना रुग्णालयात बेड आणि रुग्णवाहिका मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांचे हे हाल त्वरित थांबवावेत. रुग्णांसाठी डॅशबोर्ड सुरू करावा, आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या दालनासमोर भाजपचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी मूक आंदोलन केले. यावेळी ईटीव्ही भारतसोबत बोलताना प्रभाकर शिंदे यांनी मुंबई पालिका प्रशासन मुके, बहिरे आणि आंधळे झाल्याचा आरोप केला.
हेही वाचा... मुंबई पालिका रुग्णालयातील गैरहजर कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस, रिक्त पदी कंत्राटी भरती
मुंबईत कोरोनाचे दररोज हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांना वेळेवर रुग्णालयात बेड मिळत नाहीत. बेड मिळण्यासाठी रुग्णांना 10 ते 12 तास वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी वेळेवर रुग्णवाहिका येत नसल्याने त्यासाठीही रुग्णांना 5 ते 6 तास वाट बघावी लागत आहे. रुग्णांची ससेहोलपट थांबवता यावी, म्हणून पालिकेने डॅशबोर्ड बनवून अॅप आणि वेब साईटवर आणावा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून आम्ही करत आहोत. मात्र, पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. डॅशबोर्ड अॅपवर आणल्यास नागरिकांना कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
मुंबई पालिकेने खासगी रुग्णालयामधील 80 टक्के खाटा ताब्यात घेऊ, असे सांगितले होते. मुंबईत खासगी रुग्णालयात 23 हजार खाटा आहेत. मात्र, त्यापैकी 80 टक्केही खाटा 18 हजार खाटा पालिकेने अद्याप ताब्यात घेतलेल्या नाहीत. तसेच डॅश बोर्ड नसल्याने मुंबईकरांना रुग्णालयात खाटा मिळत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोविड रुग्णालयात पाणी साचले होते. ते काढण्यासाठी पालिकेला पंप लावावे लागले आहे. यावरून पालिका कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम करत आहेत. पालिका प्रशासन आणि रुग्णालय तसेच कंत्राटदार यांचे लागेबांधे आहेत का? रूग्णांच्या प्रश्नावर दुर्लक्ष का केले जात आहे ? मुंबईचे पालिका प्रशासन मुके, बहिरे आणि आंधळे झाले आहे, असा घणाघात यावेळी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.