मुंबई - औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून राज्यात भाजपा-महाविकास आघाडी आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना नामांतरावरून पूर्वी आग्रही होती, मात्र आता सत्तेतील मित्र पक्ष विरोध करत असल्याने तेदेखील औरंगाबाद नामांतरात विरोध करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
'जनतेच्या डोळ्यात धूळफेक'
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका ट्विटमध्ये औरंगाबादला संभाजीनगर म्हटल्याने भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबादला संभाजीनगर म्हटले, हे तुम्हाला करायचे आहे की नौटंकी करताय अशी टीका केली आहे. याचे उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावे लागेल. ते म्हणाले, की आम्ही व सामान्य जनता इतक्या दिवसापासून मागणी करत असल्यामुळे अखेर त्यांना काल मंत्रिमंडळात औरंगाबाद नामांतर करण्याविषयी निर्णय घ्यावा लागला व आज मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादला संभाजीनगर म्हटले आहे. हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे. आमचा प्रश्न आहे तुम्हाला हे मनापासून करायचे आहे, की तुमची ही नौटंकी आहे. जर हे तुम्हाला मनापासून करायचे होते तर औरंगाबाद महापालिकेत तुमची पाच वर्षे सत्ता होती, त्यावेळेस का नाही केले. त्यावेळी कोणत्या कुंभकर्णाच्या निद्रेत होतात. आता काँग्रेस विरोध करत आहे. मात्र हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.
मंत्रिमंडळात चर्चा
दरम्यान, काल औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित मंत्र्यांना कळवले आहे. पण औरंगाबाद नामांतराविषयी थेट निर्णय न घेता, नामांतराविषयी मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी औरंगाबाद नामांतरावरून कधी निर्णय घेते, हे पाहणे गरजेचे आहे.