मुंबई - वांद्रे कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. एमएमआरडीएच्या विकास कामांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. परंतु, लोकार्पण कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांना पत्राद्वारे कळवलेसुद्धा आहे.
हेही वाचा - #MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
या सगळ्या संदर्भात आज विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय परंपरेला हे न शोभणारे काम आहे, त्यामुळे या कृतीचा मी तीव्र निषेध नोंदवत आहे. आजच्या कार्यक्रमावर मी बहिष्कार टाकलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत मुंबईच्या विकासासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतलेले आहेत. त्यांनी रात्री दोन-दोन, तीन-तीन वाजता सुद्धा कामाच्या ठिकाणी भेट दिलेल्या होत्या. ज्यांनी या विकासकामांचा पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे गरजेचे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधीच झालेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असा चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रकार महाविकासआघाडी ने सुरू केलेला आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. निमंत्रण पत्रिकेवर जाणीवपूर्वक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला गेलेला नाही, त्यामुळे मी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असेही दरेकर म्हणाले.
मलाड आणि कांदिवली येथील मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर सुद्धा आम्ही बहिष्कार टाकला होता. त्यावेळेस आमचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी आंदोलन सुद्धा केले होते. या सरकारला यात काही देणे घेणे नाही. राज्य सरकारची मनमानी या ठिकाणी सुरू आहे 'हम करे सो कायदा' अशी कृती राज्य सरकारची सुरू असल्याची खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'चा धोका: राज्यात पुन्हा निर्बंध; पाहा, काय सुरू काय बंद