मुंबई - भाजपाचा पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईभर भाजपाकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल रथ मुंबईत फिरविण्यात येत आहे. भाजपाचा पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड चेंबूरमध्ये करण्यात आली आहे. सत्ताधारी लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ही तोडफोड केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
शिवसेनेकडून हल्ला? - आजपासून (मंगळवारी) मुंबईत चेंबूर कॅम्प येथे भाजपाच्या पोलखोल अभियानाचे उद्घाटन भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार होते. त्याआधीच काही अज्ञात लोकांनी गाडीवर दगड मारून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्ही अशाने घाबरणारे नाहीत. त्यांची पोलखोल करणार, असा इशारा यावेळी भाजपाकडून देण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक राजेश शिरवाडकर यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या गैर व्यवहाराबाबत भाजपाकडून पोलखोल अभियान रथ यात्रेची सुरुवात आज होत आहे.
'मुंबईकरांच्या पैशाची लूट सत्ताधारी करत आहेत' : प्रविण दरेकर यांनीही शिवसेनेला आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे. आमच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड विरोधकांकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचा पालिकेतील कारभार सगळ्यांनाच माहित आहे. आम्ही या कारभाराची पोलखोल करणार आहोत. त्यामुळे असे हल्ले होत आहेत. परंतु यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सराकरच जबाबदार राहिल. आम्ही लोकशाही पद्धतीने हा विरोध करत आहोत. आंदोलन करत आहोत. तो आमचा अधिकार आहे. मात्र, अशा घटना जर घडल्या तर राज्य सरकारची जबाबदारी राहिल, असे दरेकर म्हणाले. मुंबईकरांच्या घामाच्या पैशाची लूट सत्ताधाऱ्यांनी लगावली आहे. कराच्या रूपाने महापालिकेला पैसे येतात व त्या जीवावर हे आपली घरे बांधत आहेत. मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशाच काय होत आहे आणि मुंबईकरांच्या पैशाची कशी लुटमार केली जाते आहे ते आपण पाहत आहोत. मुंबईत रस्त्याचा प्रश्न आहे. या पोलखोल अभियानाच्या रथावर सत्ताधारी लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ही दगडफेक केलेली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
'लवकरात लवकर कारवाई करा!' : आज सायंकाळपर्यंत तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली नाही तर आम्ही उद्या पुन्हा पोलीस स्टेशनला घेराव घालून आंदोलन छेडू, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. ज्या पद्धतीने पोलीस तपास करत आहेत ते सांगत आहेत, की सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नाही आहेत. हे सर्व पाहता पोलिसांवर सरकारचा दबाव असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Shivsena vs BJP Mumbai : भाजपाच्या पोलखोल सभेआधीच शिवसेनेची तोडफोड