मुंबई - आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांची दुसऱ्या दिवशीही आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास साडेतीन तास चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमैयांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष केले असून चार दिवसाची चौकशी समज आता आपण दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर तेथील तपास यंत्रणेच्या बड्या अधिकाऱ्यांशी भेटून नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबियांचे असलेले आर्थिक गैरव्यवहाराच्या संबंधाबाबतची माहिती अधिकाऱ्याने देणार असल्याचा इशारा किरीट सोमैया यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी नंदकिशोर चतुर्वेदी यांचा संबंध आल्यानंतर ते अद्यापही समोर आलेले नाहीत. मात्र ज्या दिवशी नंदकिशोर चतुर्वेदी समोर येतील त्यानंतर ठाकरे कुटुंब यांचे आर्थिक गैरव्यवहार देखील समोर येतील, असा टोलाही किरीट सोमैया यांनी लगावला आहे. न्यायालयाने आपल्याला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आपण आज दुसऱ्या दिवशीही चौकशीला हजर झालो आहोत. या पुढचे दोन दिवसही आपण चौकशीला येणार असून आपली सहकार्याची भूमिका असणार असल्याचे पुन्हा एकदा सोमैयांनी स्पष्ट केले.
'58 कोटी आले कोठून?' : आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधी 58 कोटी रुपये होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. मात्र 58 कोटी रुपयाचा नेमका आकडा कोठून आला? त्याबाबत कोणताही पुरावा अद्याप आरोप करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतर 58 कोटी रुपयांच्या पुराव्याची मागणी आपण न्यायालयात करणार असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले.