मुंबई - शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. येत्या मंगळवारी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. यावर संजय राऊत यांनी हा भाजपचा खेळ असल्याचा आरोप केला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमैया यांनी राऊत यांनी इतका संताप करायची गरज काय आहे. पैसे चोरीचे आहेत हिशोब द्यावाच लागेल, असे म्हटले आहे.
इतका गोंधळ करायची गरज काय-
पीएमसी बँक पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने ईडी असो व इतर तपास यंत्रणा तपास करत आहेत. एचडीएलएचे काही पैसे वेगवेगळ्या लोकांचा खात्यात पैसे गेले आहेत, त्याचा तपास सध्या सुरू आहे. जस ईडीला आणि आम्हाला माहीत पडलं आहे, त्यानुसार एचडीआयेलचा पैसा प्रवीण राऊत यांच्या द्वारे माधुरी राऊत यांच्या खात्यात वळवला ,व नंतर तो पैसा वर्षा संजय राऊत यांच्या खात्यात आला आहे. त्यामुळे ईडी जर चौकशी करत असेल, नोटीस पाठवत असेल, तर इतका संजय राऊत यांनी इतका गोंधळ करायची गरज काय आहे. पैसे चोरीचे आहेत हिशोब द्यावाच लागेल असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हे सगळं राजकरण आहे-
भारतीय जनता पक्ष सांगत आहे, इडीची नोटीस आली आहे. हे सगळे राजकारण आहे, ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना ते करू द्या. अजनुही आमच्याकडे ईडीची नोटीस आलेली नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात माझा माणूस नोटीस शोधायला पाठवला आहे, असे सांगत ईडी नोटीसबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच या प्रकरणी खासदार संजय राऊत हे 2 वाजता सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.