मुंबई - महानगरपालिका क्षेत्रात उपचाराविना मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली. काल (रविवार) भांडुप येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीचा पवईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमैया यांनी महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
क्वारंटाईन सेंटरमधील अनेक लोकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागत आहे. मुंबई महापालिकेचे नेमके काय सुरू आहे? लोक क्वारंटाईन सेंटरमध्ये मरत आहेत. आता तरी जागे व्हा, असे किरीट सोमैया यांनी पालिका प्रशासनाला सुनावले आहे.
हेही वाचा... मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू
मुंबईत महानगरपालिकेने उभारलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना संशयित रुग्णांचा उपचाराविना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. मात्र, तिथे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक लोकांना लक्षणे आढळली तरीही उपचार मिळत नाही. त्यामुळे काहींना जीव गमवावा लागत आहे. काल रविवारी देखील पवई क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार न मिळाल्याने एका व्यक्तीचे निधन झाल्याचे समोर आले.
भांडूप येथील या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच इतर लक्षणेही असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पालिकेला कळवले. तरिही 4 दिवसांपासून त्यांना दवाखान्यात घेतले नाही. त्यामुळे काल अखेर क्वारंटाईन सेंटरमध्येच त्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मुलाने महापालिकेच्या कारभारावर खेद व्यक्त केला आहे. तसेच आम्हाला न्याय द्या, अशी मागणी किरीट सोमैया यांच्याकडे केली. त्यामुळे महापालिकेला संवेदना आहेत का? असे किरीट सोमैया यांनी विचारले आहे.