मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वच धार्मिक विधींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र अशातच रमजान ईदची सामूहिक नमाज पीपीई घालून अदा करू द्यावी, अशी मागणी अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी केली आहे. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अराफत यांनी सांगितले, की मुस्लीम समाजात शुक्रवारची सामूहिक नमाज अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात मुस्लीम धर्मियांनी सरकारचा आदेश मान्य केला. धार्मिक भावना बाजूला ठेवून शुक्रवारची नमाज घरात अदा केली आहे. मात्र रमजान ईद हा वर्षातला अतिशय महत्त्वाचा सण असून या दिवशी पीपीई किट घालून नमाज अदा करण्याला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे.
पीपीई किट घालून वैद्यकीय कर्मचारी कोरोनापासून बचाव करत आहेत. तर मुस्लिम बांधव देखील पीपीई किट घालून नमाज अदा करू शकतात, असे शेख यांनी म्हटले आहे. राज्य मंत्री मंडळातील मुस्लीम मंत्र्यांनी समाजाच्या भावना ओळखून या नमाजला परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. तसेच मशिदीत असे सामूहिक नमाज अदा करणे शक्य होत नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मोकळ्या मैदानात नमाज अदा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.