मुंबई - राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नावांची अद्याप घोषणा झालेली नाही. राज्यपालांकडून नावे जाहीर होत नसल्याने राज्य सरकार न्यायालयात जाणार आहे. सरकारकडून हे धमकावले जात आहे. मात्र, कायद्याची भाषा करणाऱ्या सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून राज्यपालांवर टीका करावी, अशा इशारा विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी दिला.
अधिवेशन १ मार्चपासून
राज्य विधानसभा, परिषदेचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची अद्याप निवड झालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार उमेदवार असे एकूण १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली. गेल्या दोन महिन्यांपासून या नावांची घोषणा झालेली नाही. विधानसभेचे अधिवेशन येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यापूर्वी नावांना संमती न दिल्यास राज्यपालांविरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. फडणवीस यांनी यावर बाजू मांडली.
'ते संविधानात बसते का?'
न्यायालयात जाण्याची वेळ येऊ नये. परंतु, महाविकास आघाडीचे नेते ज्याप्रकारे राज्यपालांवर टीका करतात, बोलतात ते संविधानात बसते का, हे शिकून घ्यायला हवे. त्यामुळे कायद्याची भाषा करणाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच राज्यपालांवर टीका करावी, असे खडे बोल फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.