मुंबई - भारतीय जनता पक्षाचा आज ४२ वा स्थापना दिवस ( BJP foundation day ) आहे. मुंबईमध्ये भाजप मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस ( Devendra Fadnavis comment on mahavikas aghadi ) यांच्या नेतृत्वामध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापना दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांना जे काही संबोधन केले ते सुद्धा येथे ऐकवण्यात आले. येणाऱ्या दिवसांमध्ये सामान्य माणसापर्यंत सरकारी योजना, केंद्राच्या योजना पोहचवण्याचा मानस करून पक्ष मोठा करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.
हेही वाचा - Mumbai HC On ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत अल्टिमेट! मुंबई उच्च न्यायालया निर्णय
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपला संपवण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. विशेष करून इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशाचा पाठिंबा राजीव गांधी यांच्यासोबत होता. तेव्हा आपले फक्त दोन खासदार निवडून आले होते. परंतु, कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे की तेव्हा आमचे २ खासदार होते तेव्हा आम्ही घाबरलो नाही, तर आता तर आमचे ३०२ खासदार आहेत, तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही.
आज मोदी यांनी त्यांच्या भाषणातून दोन संदेश दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पहिला संदेश हा समतेचा संदेश होता. सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचला पाहिजे. हिच खरी धर्मनिरपेक्षता आहे, असे सांगत फडणवीस यांनी गोरगरीब, पीडित, शोषित जनतेपर्यंत शासनाच्या योजना, त्याचा फायदा, त्याचा लाभ त्यांना पोहचला पाहिजे, असे सांगितले. दुसरीकडे जे स्वकेंद्रित आहेत त्यांच्याविरुद्ध भाजपने लढले पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा कोणी मालक नाही. हा जनतेचा पक्ष आहे. यामध्ये कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. परंतु, सध्या सरकार विरोधात बोलले तर महाराष्ट्र सरकार जेलमध्ये टाकू, तुमच्यावर केस करू, अशा जोर जबरदस्तीने वागत आहे. विरोधकांवर सातत्याने अन्याय करण्याचे काम हे सरकार करत आहे. या विरोधात आपणाला संघर्ष करावा लागणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याबाबत एकाही प्रश्नाचे उत्तर सरकार द्यायला तयार नाही. उलट आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. पण, याला घाबरून न जाता त्यांच्याविरुद्ध संघर्ष करावा लागेल, असे देवेंद्र फडणीस यांनी याप्रसंगी सांगितले. येत्या काळात यासाठी आपणाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करून या सरकारला सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई थांबणार नाही, असा विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने फडणवीस यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना अशिष शेलार म्हणाले की, मुंबईमध्ये आज १ हजार २०० ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम करण्यात येत आहेत. आज कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात जो काही विकास झाला, सर्वसामान्य जनतेला जो आधार भेटला आहे, त्याचा फायदा आजही पक्षाला होत आहे. परंतु, सध्या घराणेशाही मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत असून, या घराणेशाहीविरुद्ध आपणाला संघर्ष करायचा आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकार, विशेष करून ठाकरे सरकारवर व काँग्रेसवर निशाणा साधला.