मुंबई - एसटी कामगारांच्या संपावर(ST Workers Strike) अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाही. आतापर्यंत संपकरी शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्री अनिल परब(Minister Anil Parab) यांच्याशी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम असल्याने राज्य सरकारची कोंडी झालेली आहे. तर दुसरीकडे एसटी कामगारांच्या संपाबाबत मोठे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP State President Chandrakant Patil) यांनी केले आहे. एसटीच्या संपामध्ये भाजपचा हात आहे याची कबुली चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिली आहे.
- अन्याय दूर करण्यासाठी भाजपचा हात -
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत एसटी कामगारांच्या संपाबाबत वारंवार भाजपवर निशाणा साधत आहेत. एसटीच्या सर्व संघटना बरखास्त झाल्या आहेत. एसटी कामगारांकडे बघायला कोणाला वेळ नाही. त्यांची स्थिती अवघड झाली आहे. आता एसटीचे सर्व नेतृत्व भाजपकडे आले आहे. एसटी कामगारांवर अन्याय होत आहे आणि तो अन्याय उठवण्यामध्ये भाजपचा हात असेल, तर हो भाजपचा हात आहे.
- फडणवीस सरकार काळात संपाची वेळ आली नाही -
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकीय प्रस्तावातून एसटी कामगारांच्या संपाला पूर्ण पाठिंबा भाजपने दर्शविला आहे. भाजपचे दोन नेते सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर हे पूर्णपणे एसटी कामगारांचे नेतृत्व करत आहेत. एसटी कामगारांना लगेच सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देता आला नाही तरी सरकारी कर्मचाऱ्यांना जे भेटतं ते सर्व त्यांना द्यायला काहीच हरकत नाही. त्यामध्ये कुठल्याही अडचणी यायला नकोत. अशा प्रकारच्या लोकोपयोगी सुविधा कुठल्याही सरकारने तोट्यातच चालवायच्या असतात. महामंडळ वेगळे असते तर त्या राज्याने महामंडळाला ही तूट द्यायची असते. सन २०१४ ते २०१९ या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात वेळोवेळी ही तूट दिल्याने एसटी कामगारांचे पगार थकले नाहीत व त्यांच्यावर संपाची वेळ आली नाही.
- चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ -
मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुटावा याबाबत सरकार विविध प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर विविध पक्षीय नेते सरकारशी चर्चा करून या संपाबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहेत. या संपाला भाजपने पूर्ण पाठिंबा अगोदरच दिलेला आहे. मात्र, या संपामध्ये भाजपचा हात असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.