मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर महाराष्ट्र राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने या संदर्भामध्ये आज राज्यभर एक हजाराहून अधिक ठिकाणी आंदोलन केली. एकीकडे मंत्रालयाबाहेर महा विकास आघाडीतील नेते नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते, नेते रस्त्यावर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मुंबई दादर पूर्वेकडील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सुद्धा चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil demand nawab malik resignation ) यांच्या उपस्थितीत अशा पद्धतीचे आंदोलन करण्यात आले.
नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप नेत्यांनी आज मुंबई दादर येथे आंदोलन छेडले. या आंदोलनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते किरीट सोमैया, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेलवन, आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांकडून नवाब मलिक यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना किरीट सोमैया यांनी महाराष्ट्रातील घोटाळेबाज एक डझन मंत्री असून त्या मंत्र्यांमध्ये आता चढाओढ लागलेली आहे व एक एक करून सर्वांचा नंबर लागेल असे सांगितले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्या प्रकरणी सोक्षमोक्ष केल्याशिवाय शांत राहणार नाही, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही
याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा चेहरा समजू लागला असेल. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी केल्यानंतर आता त्यांच्यामधील भ्रष्टाचार उघड होत आहे. यह तो अब अंगडाई है, आगे लढाई और बाकी है, असे म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणानंतर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचा अहवाल अद्याप बाहेर आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतर मोठमोठे नेते आतमध्ये जातील असेही त्यांनी सांगितले. तसेच, मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप आता गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.
महा विकास आघाडीचे आंदोलन फक्त दोन पक्षांचे
या प्रसंगी नवाब मलिक यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आजचे महा विकास आघाडीचे आंदोलन म्हणजे फक्त हे दोन पक्षाचे आंदोलन होते. यामध्ये शिवसेनेचा कुठेही सहभाग नव्हता. फक्त मंत्री सुभाष देसाई या प्रसंगी उपस्थित होते. यावरून आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करणे किती योग्य आहे, हे उद्धव ठाकरे यांना समजून चुकले असेल, असे प्रसाद लाड म्हणाले. आजच्या महा विकास आघाडीच्या आंदोलनामध्ये शिवसेनेचे नेते उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीमध्ये खलबत्त असल्याचे सांगितले जात होते. त्याचाच उल्लेख करत प्रसाद लाड यांनी शिवसेनेला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापुरात नवाब मलिकांविरोधात भाजपचे आंदोलन, 1993 स्फोटातील मृतांना वाहिली श्रद्धांजली
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती व त्यांना न्यायालयाने 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्र्याकडून झालेल्या या गंभीर प्रकरणात त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी हे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असे म्हणत महाविकास आघाडी सरकार विरोधात आज भारतीय जनता पार्टीने राज्यभर निदर्शने करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोल्हापुरात देखील जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते एकत्र येत निदर्शने करून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान आंदोलनाच्या सुरुवातीला ११९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली देण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरी बाणा दाखविला जाणार आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरी बाणा दाखविला जाणार आहे का? असा प्रश्न भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात आंदोलनानंतर विचारला आहे.
नंदुरबार भाजपाच्या वतीने नगर पालिका चौकात धरणे आंदोलन
अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यांना संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी नंदुरबार भाजपाच्या वतीने नगर पालिका चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - Nawab Malik : नवाब मलिक यांना न्यायालयाचा दिलासा.. आता ईडीच्या कोठडीत मिळणार 'या' सुविधा