मुंबई - भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही ! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर शरसंधान साधले. आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद -
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडिओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसे आहोत ना? असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. तसेच सामान्य जनतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत आहे. या बंदला सामान्य जनतेने देखील उत्स्फूर्त पाठिंबा दिला असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
बंद दरम्यान हिंसाचार कोण करत आहे?
स्वत: महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. त्यामुळे आम्ही स्वत: आमच्या सरकारचे नुकसान कसे करूत, या बसेस किंवा हिंसाचाराच्या घटना कोण घडवून आणत आहे, याची सविस्तर चौकशी केली जाईल अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने -
सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यावर मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधत केंद्र व योगी सरकारचा जोरदार निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही.शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले. 'महाराष्ट्र बंद' मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल, तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे. शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा - 'महाराष्ट्र बंद'वर काय म्हणाले संजय राऊत?