मुंबई - 2022 ला म्हणजेच पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवारी सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, खासदार मनोज कोटक आणि पालिकेतील काही नगरसेवक आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे कळत आहे. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की अन्य कुणाला सोबत घ्यायचं यावरही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट घालत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत का? निवडणुका पुढे ढकलल्या आणि नाही ढकलल्या तर काय प्लान असेल यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, या बैठकीत भाजपच्या सर्व विद्यमान नगरसेवकांना आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले, त्या मतदारसंघांसाठी या बैठकीत खास रणनीती तयार करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.