मुंबई - काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपने मेट्रोच्या कामात कशाप्रकारे मुंबईकरांना फसवले यांची पोलखोल करणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कांजूर मार्ग कारशेडबाबतची माहिती समोर आणली आहे. कांजूर मार्ग मधील जागेवरच फडणवीस सरकारकडून कार शेडचा प्लॅन होता, त्या जागेवर कोणताही वाद आणि दावाही नव्हता. परंतु काही आर्थिकहीत साधण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मागील काळात मुंबईकरांची घोर फसवणूक केली, असा घणाघाती आरोप सावंत यांनी यावेळी केला.
आरेच्या आंदोलनामुळे पितळ उघडे -
फडणवीस सरकार आणि भाजपला आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करायचा होता, म्हणून त्यांनी कांजूर येथील जागा कार शेड्साठी घेतली नाही, शिवाय आरेची जागा घेताना मूळ प्लॅनमध्ये केवळ २०.८२ हेक्टर इतकी जमीन ठरवली होती, आणि त्यांनी ३० हेक्टर जागा ठरवली. त्यातही प्रत्यक्षात मात्र ६२.६ हेक्टर जमीन घ्यायचा प्लॅन केला. त्यात ४० हेक्टर जमीन अधिक का घेतली? याचे उत्तर आम्हाला हवे आहे, अशी मागणी सावंत यांनी केली. दाखवले एक आणि जागा आगाव का घेतली? त्यात त्यांनी नवीन आरक्षण टाकण्याचा प्लॅन केला होता, त्यानंतर आरेचे आंदोलन झाली म्हणून हे लोक उघडे पडले, असा आरोपही सावंत यांनी केला.
कांजूर येथील जागेवर कोणाचा दावाच नव्हता-
फडणवीस यांनी मेट्रो ३ कार डेपोसाठी आणि त्यासोबत इतर व्यावसायिक वापर यासाठी त्या जागेची नोंद केली होती. त्यातून त्यांनी मुंबईकरांची फसवणूक केली. तर शनिवारी माजी मंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांनी दाखवलेले पत्र बरोबर आहे, परंतु त्यानंतर झालेल्या प्रक्रिया त्यांनी सांगितल्या नाहीत. त्यात त्यांनी लपवाछपवी केली. ज्या सुरेश बाफना यांनी तक्रार केली होती, त्यांनीच कांजूर येथील जागा सरारकाची आहे, त्यावर इतर कोणाचा दावा नाही, हे स्पष्ट केले होते. या जागेवर त्यांनी आपला दावा केला नव्हता, मग शेलार यांनी वेगळा दावा कसा केला? २६, ते ६१ कोटी रुपये या जागेसाठी देण्याचा विषयच नव्हता, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.