मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपली आहे. शिवसेना-भाजप मित्रपक्ष एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत. काही लोकांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर बंडखोरी केली, येत्या 2 दिवसांत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगू, तरी कोणी बंडखोरी केल्यास महायुतीत त्यांना कोणते स्थान मिळणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडोबांचा थंडोबा करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...
त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपली आहे. शिवसेना-भाजप मित्रपक्ष एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
हेही वाचा - विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन
तसेच लोकसभेवेळी आम्ही युती केली होती. एखाद्या मुद्दयावर मतभेद असतील, जागावाटपावरून तिढा असेल पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या महायुतीची चलती आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आमचे तिकीट हवे आहे. त्यामुळेच यादी जाहीर करण्यासाठी उशीर लागला. जागा वाटप करत असताना महायुतीमधील सर्वच पक्षांना तडजोड करावी लागली आहे. मात्र, महायुतीसाठी आम्ही ती केली. युतीला राज्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक
युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र, युती होणार यावर आम्ही ठाम होतो. वैचारिक भूमिका आम्ही दोन्ही पक्षांनी स्वीकारली. लोकसभेवेळी मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड प्रमाणात यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत विजयात महाराष्ट्राने मोठा वाटा दिला. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आजपर्यंत कोणाला मिळाला नाही एवढा विजय आम्हाला मिळेल ही खात्री आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - उमेदवारी न मिळणं अनपेक्षीत, आत्मपरिक्षण करणार - विनोद तावडे
जागावाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. भाजप 150, शिवसेना 124 आणि मित्रपक्ष 14 जागा असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
लोकसभेनंतर विधानसभेला युती होईल का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र, आमची विचारधारा एक असल्यामुळे आम्ही युती केली. लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युतीला यश मिळाल्यानंतर राज्यातील जनतेचीच विधानसभेला युती व्हावी, ही इच्छा होती असल्याचे ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंचे मी विशेष स्वागत करतो. आता ते आमच्यासोबत विधानसभेत असणार आहेत. आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात मला शंका वाटत नाही. हे युवा नेतृत्व काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांच्या नेतृत्वाचा विजय होईल, असे फडणवीस म्हणाले.
आमच्यामुळे माध्यमांना पुढेही बातम्या मिळतील. पण, त्या सकारात्मक बातम्या असतील. शिवसेना आणि भाजपची उमेदवार यादी पाहिली तर आम्ही निष्ठावंतांनाच उमेदवारी दिलेली आहे. काही ठिकाणीच बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. बंडखोरी झाली असली तरी आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.