मुंबई - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ( BJP National Executive ) २ आणि ३ जुलै रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भाजप नेते फार मोठे उत्साहात आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असल्याकारणाने भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या सहित प्रमुख नेत्यांना गैरहजर राहण्यास मुभा देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दोन्ही दिवस उपस्थिती - २ व ३ जुलै रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या भाजपच्या दोन दिवसाच्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दोन्ही दिवस उपस्थित असणार आहेत. त्याच बरोबर पक्षाचे १८३ पदाधिकारी, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील भाजप नेत्यांना अनुपस्थिस मुभा ? - राज्यात सध्या शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आहेत. या सर्व घडामोडींवर भाजप नेते विशेष करून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत व त्याबाबतची पावले ते सावधपणे उचलतही आहेत. म्हणूनच या कार्यकारणीच्या बैठकीला देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विधानपरिषद प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांना अनुपस्थित राहण्याची मुभा दिल्याची माहिती समोर आली आहे. कारण राज्यातील परिस्थिती पाहता या नेत्यांचं सध्या राज्यात राहणं महत्त्वाचं समजलं जात आहे.
पुढील वर्षी निवडणुका ! - तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस नेते चंद्रशेखर राव हे मागील काही काळापासून भाजपवर टीका करताहेत. या पार्श्वभूमीवर राव यांना शह देण्यासाठी भाजपने नियोजन केले आहे. त्यासोबत पुढील वर्षी तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होत आहेत. त्याच कारणासाठी २ आणि ३ जुलै रोजी हैदराबाद येथे पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची घेण्याचे ठरले आहे.