मुंबई - विनायक दामोदर सावरकरांवर काँग्रेस नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट केल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. काँग्रेस व भाजपा यांच्यासाठी सावरकर हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत आणि याच अनुषंगाने नितीन राऊत यांच्याविरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आले.
काय आहे ट्विटमध्ये?
काँग्रेसचे नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सावरकर यांच्याविषयी ट्विट केले आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात छापण्यात आलेली दोन टपाल तिकीटे त्यांनी ट्विटरवर टाकली आहेत. त्यामध्ये एक तिकीट सावरकर यांचे तर दुसरे तिकीट एका माकडावर काढण्यात आले होते. या टपाल तिकिटांच्या किंमतीवर राऊतांनी भाष्य केले आहे. सावरकर यांच्यावरील टपाल तिकीट 20 रुपयांचे तर माकडावरील टपाल तिकीट 100 रुपयांचे आहे. इंदिरा गांधींच्या काळात ही टपाल तिकिटे छापण्यात आली होती. यात माकडाची किंमत पाच पटीने जास्त आहे, असे राऊत म्हणाले आहेत. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, नितीन राऊतांनी हे ट्विट डिलीट केले आहे.
राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले होते चर्चेत
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी एक वक्तव्य केले होते. महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, असे ते म्हणाले होते. त्यावरून पुन्हा एकदा वाद-प्रतिवाद सुरू झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही टपाल तिकीटे आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.
भाजपा आक्रमक
एका कॅबिनेट मंत्र्याच्या पेजवर सावरकर यांचा अवमान करणारे अशा पद्धतीचे ट्विट शोभत नाही, असे सांगत नितीन राऊत यांनी या प्रकरणाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत भाजपाने आंदोलन छेडले आहे.