मुंबई - मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढला. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला . भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र, शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसह सेनाभवन परिसरात दाखल झाल्याने वातावरण तणावाचे झाले होते.
राम जन्मभूमीची जमीन खरेदीवरून वाद निर्माण झाला होता, त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. शिवसेनेला राम जन्मभूमी मुद्द्यावर बोलण्याचा कोणताच अधिकार आता उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली होती. या सर्व प्रकरणावर आज भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवनावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.
हेही वाचा - Maratha Reservation : ...तर नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा करू - संभाजीराजे छत्रपती
- संजय राऊत यांनी केली होती भाजपवर टीका -
काही दिवसांपूर्वी राम जन्मभूमीची जमीन खरेदीवरून वाद निर्माण झाला होता. या संदर्भात खुलासा आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी केला होता. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत संघाच्या सरसंघचालकांनी यासंदर्भातले स्पष्टीकरण द्यावे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं होतं.
- भाजप आक्रमक -
दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली. शिवसेनेला राम जन्मभूमी विषयावरती बोलण्याचा आता नैतिकतेचा कोणताही अधिकार उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली होती. आज त्याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा मुंबईकडून शिवसेना भवनावर आंदोलन करण्यात आले. त्यावेळीच शिवसैनिकांनी शिवसेना भवनासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हेही वाचा - ‘रामायण’ मालिकेतील 'आर्य सुमंत' ज्येष्ठ अभिनेता चंद्रशेखर कालवश
- अंगावर याल तर शिंगावर घेऊच - महापौर किशोरी पेडणेकर
अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे. भाजप युवा मोर्चाच्यावतीने आज दादर येथील शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना भवनवर मोर्चा काढणं कितपत योग्य याचंही उत्तर द्यावं, शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडला आहे. तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का? अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली आहे.