मुंबई - बारामती लोकसभा जिंकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी केला. पण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पदरी निराशात पडली. मात्र पुन्हा एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबीय नेहमीच केंद्रस्थानी राहिले बारामतीच्या बालेकिल्लातून शरद पवार नेहमीच आपलं राजकारण देशभरात पसरवलं. मात्र बारामतीचा हा गड हलवण्यासाठी विरोधकांनी अनेकवेळा तमाम प्रयत्न केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड हलवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. ज्याप्रमाणे राहुल गांधी यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत व्हावं लागलं. त्याचप्रमाणे बारामतीच्या मतदारसंघात देखील भारतीय जनता पक्ष विजय मिळवेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
आधीही बारामती जिंकण्याचे झाले होते प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्याने नियुक्ती झाली आहे. याआधी असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी बारामतीच्या मतदारसंघात तळ ठोकला होता. खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जंग जंग पछाडले. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून भरघोस मताने विजय मिळवला. 2014 च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा देत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरवलं होतं. मात्र त्यावेळीही महादेव जानकर यांचा पराभव झाला होता.
गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त - अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर उतरले होते. मैदानात केवळ लोकसभा मतदार संघ नाही तर, विधानसभा मतदारसंघात देखील भारतीय जनता पक्षाने आपली ताकद पणाला लावली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकद लावून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढले होते. मात्र तरीही जवळपास एक लाख मतांच्या फरकाने अजित पवार विजय झाले. तर, गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बारामतीचा लोकसभा आणि विधानसभा संघाला धक्का पोहोचवता आला नव्हता.
2024 च्या निवडणुकीसाठी खास रणनीती - 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी बारामतीचा गड जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती तयार केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मिशन 45 अंतर्गत काही केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून 48 पैकी 45 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची खास जबाबदारी अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारमण यांना देण्यात आली आहे. 22 ते 24 सप्टेंबर या तीन दिवसात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील दौरा करणार आहेत. त्यांच्याकडे या मतदारसंघाची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात विजय मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री खास रणनीती आखणार आहेत. त्याबाबतच्या बैठका या तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये निर्मला सीतारमण घेतील.
बारामती मतदारसंघ जिंकण्याचा स्वप्न स्वप्नच राहील - बारामती मतदारसंघ जिंकण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न आहे. मात्र त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. भारतीय जनता पक्षाचे स्वप्न स्वप्नच राहील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर केली आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकारणापेक्षा समाजकारण अधिक केले आहे. तसेच आपल्या कामाची छाप अनेकवेळा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दाखवली. यासाठी त्यांना उत्कृष्ट संसद महारत्न हा किताबही मिळाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असे महेश तपासे म्हणाले आहेत.