मुंबई - सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास बिहार पोलीस करत आहेत. त्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले असता, त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यावरून वाद झाला असताना तिवारी यांना सात दिवसाच्या आत बिहारला परत जाण्याच्या अटीवर क्वारंटाइनमुक्त केले जाईल, असे मुंबई महापालिकेने बिहार पोलिसांना कळविले आहे. विनय तिवारी आज बिहारला परत जाणार आहेत.
सुशांतसिंह राजपूत याचा मुंबईत मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी बिहारमध्ये याबाबत एफआयआर नोंदवला आहे. त्याचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस दलातील अन्य अधिकारी रस्ते, रेल्वे मार्गाने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर आयपीएस अधिकारी विनय तिवारी विमानाने मुंबईत आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाइनप्रमाणे आंतरराज्य विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला १४ दिवस क्वारंटाइन केले जाते. या नियमानुसार तिवारी यांना क्वारंटाइन करण्यात आले.
तिवारी यांना क्वारंटाइन केल्याने भाजपाने या प्रकरणाचा तपास केला जात नाही, असा आरोप करत वाद निर्माण केला होता. त्यावर पालिकेने तिवारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच तिवारी यांना क्वारंटाइनमधून सूट हवी असल्यास त्यांना नियमानुसार सात दिवसाच्या आत बिहारला परत जावे. तसे परतीचे तिकीट पालिकेला सादर करावे, असे पालिकेने बिहार पोलिसांचे अतिरिक्त डिजी जितेंद्र कुमार यांना पत्राद्वारे कळविले आहे.
तिवारी यांनी ८ ऑगस्टच्या आधी परत जावे, असेही पालिकेने सांगितले आहे. तिवारी यांनी बिहारला परत जाण्याचे मान्य केल्याने त्यांना क्वारंटाइनमुक्त करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले आहे.