मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाची संपूर्ण माहिती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीने घेतली. त्यानंतर मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचा निर्णय कमिटीने घेतल्याचे सुत्रांकडून समजत आहे. रात्री उशिरा मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते. मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे केवळ फसवणूकच असल्याचा निष्कर्ष राष्ट्रवादीच्या बैठकीत काढण्यात आला. आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या विरोधात भाजप आणि मनसेच्या काही नेत्यांनीही तक्रारी आणि निवेदन दिले आहेत. त्यानंतर पक्षाने राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.
विरोधकांनी केली होती राजीनाम्याची मागणी
रेणू शर्मा या महिलेने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत त्यांच्या विरोधात सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून गदारोळ सुरू केला होता. तर शर्मा यांचा आधार घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी निवडणूक आयोगाकडे मुंडे यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. शिवाय त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. मात्र मुंडे यांच्या मागे पक्ष खंबिरपणे उभा राहिला आहे.
पोलीस चौकशी करून सत्य बाहेर आणतील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे फसवणुकीच्या दृष्टीने करण्यात आले असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी चौकशी करावी आणि त्यातून जे सत्य बाहेर आणावे असे म्हणले आहे. त्यानंतर निर्णय घेऊ अशी माहिती दिली. तसेच या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीत आम्ही कुठल्या हस्तक्षेप करणार नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. रेणू शर्मा यांच्या विरोधात भाजपाच्या एका माजी आमदारासोबत मनसेच्या एका नेत्यांनीही आणि तसेच जेट एअरवेजच्या एका अधिकाऱ्यांनीही आपली रेणू शर्मा हिच्याकडून फसवणूक झाली असल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांची ही फसवणूक असल्याचे दिसत असून यामुळे या प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच सत्य समोर येईल असेही जयंत पाटील म्हणाले.