मुंबई: दहीहंडीनिमित्त १९ ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगर तसेच जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. मंत्रालयासह सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली होती.
दोन वर्ष कोविडमुळे बंदी : गेली दोन वर्ष कोरोनामुळे राज्यातील सणांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार येताच सणावरील नियम हटवून निर्बंधमुक्त सण साजरे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी गणपतीच्या मूर्तींच्या उंचीवरील बंदी हटवण्यात आली होती, त्यापाठोपाठ आता जनतेला दहीहंडी सण उत्साहाने साजरा करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर दहीहंडी थरांच्या उंचीबाबत माननीय न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सरनाईक यांनी केली होती मागणी : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतेच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी हा सण राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करावा. तसेच या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्यावी अशी मागणी केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, आमदार या नात्याने मी शासनाकडे यापूर्वीही पाठपुरावा केला आहे. दहीहंडीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातून केवळ मुंबई आणि ठाणे विभागालाच सुट्टी जाहीर केली जाते. पण, सार्वजनिक सुट्टीसाठी शासन स्तरावर अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
तरुण वर्ग प्रचंड उत्साही : गेल्या दोन वर्षात कोविडमुळे या सणावर विर्जन पडलं होतं. पण आता परिस्थिती बदलल्याने तरुण वर्ग प्रचंड उत्साही आहे. महाराष्ट्राबरोबरच देश विदेशातही हा सण लोकप्रिय झाला आहे. भारतात स्पेन सारख्या देशातून स्पर्धक येत आहेत.त्यामुळे यंदा १९ ऑगस्ट २०२२ रोजी दहीहंडीचा सण असून मुख्यमंत्र्यांनी सुट्टीबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
लक्षवेधी दहीहंड्यांचे आयोजन : दरवर्षी गोविंदा पथके 'दहीकाला उत्सव' मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. मुंबईत दरवर्षी लक्षवेधी दहीहंड्यांचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे दोन वर्ष उत्सव साजरा झाला नव्हता. राम कदम यांनी गत वर्षी आगळीवेगळा दहीहंडी उत्सव साजरा करताना कोरोना महामारीतून भारत मुक्त व्हावा या संकल्पनेतून प्रतिकात्मक दहीहंडी उत्सव साजरा केला होता. प्रतिकात्मक दहीहंडी उत्सवातून कोरोनामुक्त भारत आणि चिनी वस्तूवर बहिष्कार ही संकल्पना ठेवण्यात आली होती.