मुंबई - गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले भूपेंद्र पटेल आज (सोमवार, दि. 13)रोजी दुपारी २:२० वाजता पदाची शपथ घेणार आहेत. याबाबत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या शपथ विधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे.
रुपाणी यांनीच सुचवले नाव
विजय रुपाणी यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांची एकमताने गुजरातचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रुपाणी यांनीच या पदासाठी पटेल यांचे नाव सुचवले आहे. अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार असलेले पटेल हे राज्याचे मुख्यमंत्री होणारे गुजरातमधील पाचवे पाटीदार नेते असती ल.
वरिष्ठ नेत्यांचे मानले आभार
मुंख्यमंत्री म्हणून नाव घोषीत झाल्यानंतर पटेल यांनी माध्यमांशी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रमुख जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. आपल्यावर या जबाबदारीबाबत विश्वास ठेवल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो असही पटेल यावेळी म्हणाले आहेत. त्यांनी विद्यमान सीएम विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल, सीआर पाटिल आणि पक्षाच्या इतर नेत्यांचेही आभार मानले. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा आशीर्वाद असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.