मुंबई - बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात बुधवारी भारत बंदची हाक दिली. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांनी सीएए व एनआरसीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डीएनए आधारित एनआरसी करा, सीएए हटवा, ईव्हीएम बंद करा व देश वाचवा या प्रमुख मागण्या भारत बंद आंदोलनात करण्यात आल्या.
हेही वाचा.... देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शरजील इमामला दिल्लीत हलवले
राज्यात ठिकठिकाणी भारत बंदचा परिणाम पहायला मिळाला, तसेच काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले...
रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंदला प्रतिसाद
बहुजन क्रांती मोर्चातर्फे केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशात बंद पुकारला. त्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात गोरेगाव आणि खोपोली येथे बंदला प्रतिसाद मिळाला. तरीही जिल्ह्यात इतर तालुक्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. या बंदबाबत व्यापाराच्या दोन गटात भिन्न प्रवाह पाहायला मिळाला.
भारत बंदला पुणे शहरात काही भागात प्रतिसाद, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली. या बंदचा पुणे शहर आणि ग्रामीण भागात काही प्रमाणात प्रभाव दिसून आला. पुणे शहरातील कॅम्प, कोंढवा, मोमीनपुरा, नाना पेठ, भवानी पेठ, ताडीवाला रोड भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. काही भागात नागरिकांनी मोर्चे काढत निदर्शने करत दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. साधारण 200 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात बदनापूर बंद
एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या सर्व पक्षीय भारत बंदला बदनापूर शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि व्यवहार सकाळपासून बंद ठेवत, या भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला. तर सर्व पक्षीय सदस्यांनी रॅली काढून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
बहुजन क्रांति मोर्चाच्या भारत बंदला मुंब्रा येथे मोठा प्रतिसाद
CAA आणि NRC विरोधात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली होती. या बंदला ठाण्यातील मुंब्रा येथे सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. मुंब्रा येथे पुर्णत: बंद पाळण्यात आला असून सर्व खासगी दुकाने, शाळा, कॉलेज, वाहतूक पुर्णपणे बंद होती.
एनआरसी, सीएए विरोधात भारत बंद, भोकरदन शहारात कडकडीत बंद
भोकरदन शहरात एनआरसी, सीएएविरोधात बंद पाळण्यात आला. भोकरदन शहरातून रॅली काढण्यात आली. तसेच काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. परंतु पोलिसांनी वाहने जाण्यासाठी मार्ग मोकळा केल्यामुळे नंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
हेही वाचा... मोदी सरकारच्या काळात एनजीओला विदेशातून मिळणाऱ्या देणग्यांचा उच्चांक
भारत बंदला ठाण्यात संमिश्र प्रतिसाद : महामार्गावरील हॉटेल बंद; तर बदलापुरात हिंसक वळण
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, शहरात ५० टक्के व्यवहार बंद असल्याचे पाहयला मिळला.
हिंगोलीत बंद विशेष प्रतिसाद नाही
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी CAA व NRC कायदा आणि ईव्हीएमच्या विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली होती. परंतु या बंदला हिंगोलीमध्ये कुठेही प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले नाही. हिंगोली शहरातील व्यवसाय दैनंदिन नियमानुसार सुरळीत सुरू असल्याचे पहायला मिळाले.
भारत बंदला लातूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, सततच्या बंदमुळे मोठे नुकसान होत असल्याने लातूरसह उदगीर, अहमदपूर, जळकोट येथील व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदची हाक, म्हसळा शहरात शुकशुकाट
सीएए, एनआरसी आणि ईव्हीएम मशीन विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आला. या भारत बंदमुळे म्हसळा शहरातील हॉटेल, किराणा दुकाने, भाजी मार्केट, आणि इतर दुकाने काही अपवाद वगळता पुर्णपणे बंद होती. नेहमी ग्राहकांनी गजबजलेल्या बाजार पेठेत बंदमुळे शुकशुकाट पहायला मिळाला.
उल्हासनगरात बहुजन क्रांती मोर्चाकडून जेलभरो आंदोलन
केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात बहुजन मुक्ती मोर्चाने पोलिसांकडे रॅलीची परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने बहुजन क्रांती मोर्चाच्या समर्थकांनी जेलभरो आंदोलन केले.़
भारत बंदला जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; आंदोलनात तृतीयपंथीयांचा समावेश
केंद्र सरकारच्यावतीने पारित करण्यात आलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या निषेधार्थ बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी जळगावात एका सलून दुकानावर तर भुसावळ शहरात एका हॉटेलवर काही उपद्रवी आंदोलकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी वेळीच धाव घेत अशा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, तृतीयपंथीय देखील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनीही आपला विरोध दर्शवला.
हेही वाचा... निर्भया प्रकरण : आरोपी मुकेशची याचिका फेटाळली; दुसऱ्या आरोपीने दाखल केली क्युरेटिव्ह पिटीशन..